राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना जाहीर
नवी दिल्ली, 28 जानेवारी (TNA) समुद्रात मोठ्या प्रमाणावर असलेल्या विविध प्राण्यांचे आणि सागरी कासवांचे संवर्धन करण्याची गरज लक्षात घेऊन पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने आज नवी दिल्ली येथे ‘सागरी महा प्राणी संपत्ती मार्गदर्शक तत्वे’ आणि ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर करण्यात आली|
आभासी पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, सागरी जैववैविध्यासह फुलांची आणि प्राण्यांची विविधता हेच भारताचे सौंदर्य आहे. आपल्याला शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने आणि आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करून या जैववैविध्याचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज आहे|
भारताला 7500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. या समुद्रामध्ये समृद्ध जैवविविधता आहे. त्यामध्ये रंगबिरंगी माशांपासून शार्क, देवमासे, वेगवेगळ्या प्रकारची कासवे, महाकाय सस्तन प्राणी, डॉल्फिन, चमकदार प्रवाळ अशा असंख्य प्रकारच्या सागरी प्रजाती भारतामध्ये आहेत. या सागरी प्राण्यांमुळे मानवी आरोग्यासाठीही आवश्यक साधनसामुग्री मिळते|
सागरी व्यापार आणि वाहतूक, अन्न, खनिज स्रोत, सांस्कृतिक परंपरा, त्याचबरोबर अध्यात्मिक मूल्ये आणि विश्वभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणा-या सागरी किना-यांच्या स्रोतांवर लक्षावधी लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे|
भारतामध्ये सागरी अधिवासांला आर्थिक, पर्यावरणीय महत्व आणि सांस्कृतिक मूल्ये असूनही सागरातल्या महा प्राणी संपत्तीला आणि सागरी कासवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे| अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागाबरोबरच समन्वय साधून कृती करण्याची आवश्यकता आहे. यामुळे सागरी प्रजाती आणि त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी मदत मिळू शकणार आहे|
आज जाहीर करण्यात आलेल्या कृती योजनेमध्ये सागरी प्राणी संपत्ती संवर्धनासाठी केवळ आंतर-क्षेत्रीय कार्यक्रमाला चालना मिळणार आहे, इतकेच नाही तर सागरी सस्तन प्राण्यांच्या संवर्धनातील समस्या सोडविण्यासाठी सरकार आणि समाज तसेच संबंधित भागधारक यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे शक्य होणार आहे| त्याचबरोबर सागरी कासवांचे संवर्धन करणेही सुकर होणार आहे, असेही प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले|